महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे – अजित पवार

0

पुणे : महाराष्ट्र पोलीस दलातील शूर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविला आहे, यामुळे पोलीस दलाचा एक गौरवशाली इतिहास आहे; यापुढेही अशाच पद्धतीने देशासह जागतिक पातळीवर पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबत पोलीस दलाचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगले काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधिनस्त नारायणगाव पोलीस ठाणे नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी, उप विभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या अपेक्षापूर्ती करण्याकरीता काम करावे
पवार म्हणाले, पोलीस ही शासन व्यवस्थेतील महत्त्वाची संस्था असून शासनाचा दृश्य प्रतिनिधी म्हणून ते काम करीत असतात. पोलीस दलाकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीवर समाजात पोलीस दलाची पर्यायाने शासनाची प्रतिमा निर्माण होत असते. पोलीस ठाण्यात आल्यानंतर नागरिकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, समाजातील अपप्रवृत्तीस प्रतिबंध घालण्यासोबतच चुकीचे काम करणाऱ्यांना शासन झाले पाहिजे, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राहिली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांची असते. त्यामुळे शासन म्हणून नागरिकांच्या अपेक्षापूर्ती करण्याकरीता काम स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने काम करावे.

पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे राज्य शासनाची जबाबदारी
राज्यात 21 हजार कोटी रुपये सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीला उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यापैकी पोलीस दलाच्या पायाभूत सुविधांकरिता 600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये राज्यात 1 हजार 400 कोटी रुपयाचा सर्वाधिक निधी पुणे जिल्ह्याला दिला असून यापैकी 42 कोटी रुपये जिल्हा पोलीस दलाकरिता मंजूर करण्यात आले. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा ग्रामीण दलाने एकत्रितरित्या समन्वयाने सायबर गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना, अँटी ड्रोन गन, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहने अशाप्रकारे नागरिकांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने प्राधान्याने पोलीस दलासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर भर देण्याचा सूचना दिल्या आहे.

राज्य शासनाच्या कार्यालयांच्या नूतनीकरणावर भर
राज्य शासनाच्या कार्यालयाच्या इमारतींचे नूतनीकरणावर भर देण्यात येत असून त्यानुसार सर्वत्र काम सुरु आहे. आज नारायणगाव पोलीस ठाण्याची 3 एकर जागेपैकी 10 गुंठ्यांत हे नवीन इमारतीचे काम झाले असून शहराच्या वैभवात भर पडली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे. तसेच नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना आणखीन वाढेल. त्यामुळे पोलीस ठाण्याचा कारभार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासोबतच त्यांचा विश्वास संपादन करणारा असावा.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech