छत्रपती संभाजीनगर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत अंबादास दानवे यांनी पोस्ट केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या संदर्भात ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारच्या वतीने ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्दप्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे देशात काँग्रेस विरुद्ध हिंदू समाजामध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची एकत्र शिवसेना ही भाजपसोबत होती. या शब्दप्रयोगाचा विरोध त्या वेळी युतीच्या माध्यमातून करण्यात आला होता.
त्यानंतर आता या प्रकरणाचा सतरा वर्षानंतर निकाल समोर आला आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या काँग्रेस सोबत महाविकास आघाडीमध्ये आहे. असे असताना या प्रकरणाबाबत शिवसेनेची प्रतिक्रिया अद्याप समोर आली नव्हती. त्यात आता अंबादास दानवे यांनी सत्यमेव जयते म्हणत या प्रकरणावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.