मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ जून रोजी झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील रमेश खरमाळे आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीने केलेल्या पर्यावरण रक्षणाच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या महिन्यात आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक उपक्रम केले. अनेकांनी आपल्या परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी एकट्याने प्रयत्न करणाऱ्या लोकांची माहिती दिली.
पुणे जिल्ह्यातील रमेश खरमाळे यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. आठवड्याच्या अखेरीस जेव्हा बहुतेक लोकं घरी बसून आराम करणे पसंत करत असतात तेव्हा रमेश खरमाळे आणि त्यांचे कुटुंबीय कुदळ, फावडे घेऊन घराबाहेर पडतात. खरमाळे कुटुंबीय जुन्नर परिसरातील डोंगरांमध्ये जातात आणि जमिनीत पाणी मुरवण्यासाठी चर खणतात, बिया लावतात. फक्त २ महिन्यांमध्ये त्यांनी ७० चर खणले आहेत. खरमाळे यांनी अनेक लहान लहान तळी तयार केली आहेत, शेकडो झाडे लावली आहेत. खरमाळे हे एक ऑक्सिजन पार्क देखील उभारत आहेत. या सगळ्याचा परिणाम असा झाला की या भागात पक्षी परतू लागले आहेत. वन्यजीवनाला नवीन आयुष्य लाभले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘पाटोदा’ ही कार्बन मुक्त ( कार्बन न्यूट्रल ) ग्रामपंचायत आहे. या गावात कोणीही स्वतःच्या घराबाहेर कचरा फेकत नाही. प्रत्येक घरातून कचरा संकलित करण्याची चोख व्यवस्था केलेली आहे. या गावात सांडपाण्यावर प्रक्रियाही करण्यात येते. प्रक्रिया करून स्वच्छ केल्याशिवाय पाणी नदीत सोडले जात नाही. या गावात गोवऱ्या वापरून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. या गोवऱ्यांची राख वापरून दिवंगत व्यक्तीच्या नावे झाड लावले जाते. या गावात स्वच्छता राखण्यासाठी सुरु असलेले उपक्रम अनुकरणीय आहेत. नागरिकांच्या लहान लहान सवयी जेव्हा सामुहिक निर्धाराचे रूप घेतात तेव्हा फार मोठे परिवर्तन आपोआप घडून येते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी पाटोदा ग्रामपंचायतीच्या कामाचा गौरव केला.