आझाद मैदानात मनोज जरांगेंचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

0

आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही – मनोज जरांगे

मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा देणारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (29 ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली. सकाळी दहा वाजल्यापासून त्यांच्या उपोषणाची अधिकृत सुरुवात झाली असून हजारो मराठा बांधव त्यांना समर्थन देण्यासाठी मैदानावर दाखल झाले आहेत. आझाद मैदान परिसरात मराठा समाजाचा प्रचंड जनसागर उसळला आहे.

सरकारला दिला कठोर इशारा : उपोषणाला प्रारंभ करताना जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला – “आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, जेलमध्ये टाकलं तरी मी जेलमध्ये उपोषण सुरूच ठेवेन. मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही.” त्यांनी पुढे सांगितलं की, “आज मुंबई मराठ्यांनी जाम करून दाखवली आहे. पण सरकारने आपल्याला आंदोलनासाठी परवानगी देऊन सहकार्य दाखवले आहे. त्यामुळे आपणही पोलिसांना आणि सरकारला सहकार्य करणार आहोत.”

मुख्यमंत्री फडणवीस यांना निर्वाणीचा संदेश : जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून स्पष्ट शब्दांत म्हटलं, “मायबाप सरकारने आम्हाला बेमुदत उपोषण करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा मंगळवारपासून आणखी कोट्यवधी मराठे मुंबईकडे रवाना होतील. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. अजूनही तुमच्या हातात मराठ्यांचे मन जिंकण्याची संधी आहे. पण जर राजकारण केले, तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही.”

आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहन : मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना भावनिक आवाहन करताना सांगितले, “कुठेही दगडफेक करायची नाही, जाळपोळ करायची नाही. दारू पिऊन धिंगाणा घालायचा नाही. मराठ्यांची मान खाली घालावी लागेल असे कोणतेही कृत्य करू नका. पुढील दोन तासांत मुंबई मोकळी करा. पोलिसांनी दाखवलेल्या जागीच गाड्या पार्क करा.” त्यांनी आंदोलनात उपस्थित मराठ्यांना सावध करून सांगितले की, “कोणी राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करत असेल तर सतर्क राहा. आंदोलनाला बट्टा लावायचा नाही. मी मरण पत्करायला तयार आहे, पण मागे हटायचं नाही. विजय मिळाल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही.”

त्यांनी पुढे सांगितलं की, आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलोय, हे कुणीही विसरू नका. समाजाचे वाटोळे करू नका. कोण काय सांगतंय, कोण काय म्हणतेय हे ऐकूण घेण्यास शिका. आपण शिकलो नाही, लोकांच्या बुद्धीने चाललो, म्हणून आपल्या समाजाचे ७० वर्षे वाटोळे झाले हे कुणीही विसरू नका. समाज मोठा करण्यासाठी आपल्याला ताकद लावायची आहे. आंदोलनामुळे मुंबईकरांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यावर विशेष भर देत जरांगे म्हणाले – “मी आता आझाद मैदानावर बसलो आहे. तुम्ही इथून ५० किलोमीटरवर निर्धास्त झोपू शकता. मुंबईकरांना त्रास होणार नाही ही जबाबदारी आमची आहे.”

मराठा समाजाचे सरकारकडे अंतिम आवाहन : उपोषणाच्या प्रारंभी केलेल्या भावनिक भाषणात जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं – “आमच्या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही हलणार नाही. आमच्या डोक्यावर विजयी गुलाल पडल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. माझा बळी गेला तरी समाजाची मान खाली जाऊ नये, हेच माझे ध्येय आहे.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech