नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (ईईएल) या सोलर ग्रुपच्या संरक्षण क्षेत्रातील आयुध निर्माण करणाऱ्या कंपनीत बुधवारी मध्यरात्री १२.३४ वाजता भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत मयूर गणवीर (वय २५ ) या सुपरवायझरचा मृत्यू झाला असून १६ कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. हा स्फोट कंपनीच्या पीपी-१५ प्लांटमध्ये झाला. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटाआधी आगीची घटना घडल्यामुळे काही कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली, अन्यथा जीवितहानी अधिक झाली असती. स्फोटाचा तीव्र धक्का बाजारगावसह शिवा, सावंगा आणि इतर नजीकच्या १० गावांपर्यंत जाणवला. आवाजामुळे नागरिक घराबाहेर आले.
जखमी कामगारांची नावे – कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी, सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुटके, अखिल बावणे आणि धर्मपाल मनोहर यांचा समावेश आहे. जखमींपैकी १४ जणांना नागपूरच्या दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून २ कामगारांना राठी हॉस्पिटल, धंतोली येथे हलवण्यात आले आहे.स्फोटामुळे कंपनीच्या लाखो रुपयांची यंत्रसामग्री व साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. अपघाताच्या वेळी रात्री ११ वाजेनंतरची पाळी सुरू होती आणि कामगार प्रयोगशाळा व विविध युनिट्समध्ये कार्यरत होते. घटनेनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या वाहनाने ६ जखमींना तातडीने नागपूरकडे हलवण्यात आले. दरम्यान, कंपनीच्या आवारात सुरक्षा कारणास्तव प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पार्श्वभूमी आणि चिंता:- सोलर ग्रुप (ईईएल) ही कंपनी देशांतर्गत संरक्षण क्षेत्राला तसेच ३० हून अधिक देशांना स्फोटके आणि शस्त्रास्त्रे पुरवते. मात्र, या कारखान्यात दरवर्षी अपघात होण्याची नोंद असून कामगारांच्या सुरक्षेबाबत कंपनीकडून हलगर्जीपणा होत असल्याचे आरोपही कायम आहेत. या दुर्घटनेनंतर कंपनीच्या कार्यपद्धतीवर आणि सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
								
				 
					
										
												
				 
	
											 
	
											