माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा रात्री ८ वाजता

0

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे. दरवर्षी प्रस्थान सोहळा हा दुपारी चार ते सायंकाळी सहाच्या दरम्यान होत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी प्रस्थान सोहळा गुरुवारी (१९ जून) आल्याने परंपरेप्रमाणे नित्य गुरुवारची माउलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि आरती झाल्याशिवाय पालखीचे प्रस्थान होणार नाही. वारकऱ्यांना कष्ट होवू नयेत आणि पालखी प्रस्थान सोहळ्यास दिरंगाई होवू नये यासाठी यंदाच्यावेळी नित्य गुरूवारची पालखीची मंदिर प्रदक्षिणा सूर्यास्तानंतर सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान काढली जाईल. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम साडे सातच्या वेळेस होईल. त्यानंतर पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यास दिंड्या देउळवाड्यात घेऊन सुरूवात केली जाणार असल्याने माउलींच्या पादुकांचे प्रस्थान साधारण रात्री आठच्या दरम्यान होणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले.

डॉ. देखणे म्हणाले, ‘‘२० जूनला पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. तत्पूर्वी आळंदीत तीन चार दिवस आधीच दिंड्या, वारकरी, भाविकांची गर्दी शहरात होत असते. दरवर्षी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान साधारण सायंकाळी सहाच्या दरम्यान देउळवाड्यातून होते. मात्र, यंदाच्या वर्षी तिथीनुसार सोहळा गुरुवारी येत आहे. त्यामुळे गुरुवारची नित्याची माउलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा लवकर घेण्यात येत आहे. प्रस्थान उशीर होऊन वारकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान आरती झाल्यानंतर महाद्वारातून दिंड्यांना प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्यासाठी मंदिर प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतर प्रस्थानाचा कार्यक्रम सुरू होईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech