मुंबई : राजस्थानच्या अर्ध्या भागातून मान्सून परतला असून पंजाब, गुजरातमधूनही त्याची माघार सुरू झाली आहे. तरीही मध्य प्रदेशात पावसाची तीव्रता कायम आहे आणि पुढील दहा दिवस या राज्यात जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ३० सप्टेंबरनंतरच मध्य प्रदेशातून मान्सून हळूहळू माघार घेईल. बिहारमध्ये मान्सून सक्रिय असून पुढील आठवडाभर जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. अनेक जिल्ह्यांत मुसळधार सरींचा इशारा देण्यात आला असून, नद्यांचा पाणीपातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. लखीमपूर खेरी, बलिया आणि गोंडा या जिल्ह्यांत नदीकाठच्या वस्त्यांना पाण्याचा फटका बसला असून काही भागात पूरसदृश परिस्थिती आहे. लखीमपूर खेरीत केवळ चार सेकंदांत एक घर नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे, तर ४८ तासांत आठ घरे पाण्यात बुडाली होती. हवामान खात्याने गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांत पिवळा इशारा जारी केला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनमुळे काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुसळधार बरसलेला मान्सून यंदा ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर भारतात दाखल झाला होता आणि आता तो नियोजित तारखेपूर्वीच परतीच्या प्रवासाला लागला आहे. १४-१५ सप्टेंबरपासून मान्सूनची माघार सुरू झाली असून २१ सप्टेंबरपर्यंत ती गुजरात आणि मध्य प्रदेशपर्यंत पोहोचली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून संपूर्ण देशातून परत जाईल. महाराष्ट्रातून १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून पूर्णपणे परतण्याची शक्यता आहे, तर १५ ऑक्टोबरपर्यंत तो कर्नाटकात पोहोचेल. परतीच्या प्रवासातही मान्सूनचा जोर वाढणार आहे.
२३ ते २७ सप्टेंबर दरम्यान ओडिशात अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, २४ ते २७ सप्टेंबर या काळात झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही मुसळधार सरींची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विदर्भात ढगाळ हवामान राहील, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, मान्सूनच्या माघारी दरम्यानही अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे पूरस्थितीची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवून सावधगिरी बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे.