आंध्र प्रदेशात १०० किमी वेगाने धडकले ‘मोंथा’ चक्रीवादळ

0

वादळामुळे एकाचा मृत्यू तर दोघे जण जखमीआता वादळाचा प्रवास ओडिशाच्या दिशेने

अमरावती : ‘मोंथा’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून ओडिशाच्या दिशेने सरकले असून, त्यामुळे १५ जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला असून, २ जण जखमी झाले आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार हे वादळ हळूहळू कमजोर होत आहे. राज्य सरकारने प्रभावित भागांत अलर्ट जारी केला असून, आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ‘मोंथा’ वादळाने आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडून ओडिशाच्या दिशेने प्रवास केला आहे. याचा परिणाम ओडिशातील अनेक जिल्ह्यांत जाणवला असून, एकूण १५ जिल्ह्यांतील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.हवामान खात्याच्या मते, ‘मोंथा’ हळूहळू शक्ती गमावत आहे आणि अंदाजापेक्षा त्याची तीव्रता कमी आहे. कोनसीमा जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेमच्या घरावर झाड कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तसेच जोरदार वाऱ्यांमुळे नारळाची झाडे उन्मळून पडल्याने एक मुलगा आणि एक ऑटोचालक जखमी झाले आहेत.

चक्रीवादळाने बुधवारी पहाटे आंध्र प्रदेश व यानमच्या किनारी भागांना तडाखा दिला. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आणि वीजपुरवठा खंडित झाला. आंध्र प्रदेशात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, तर ओडिशात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अनेक विमानफेऱ्या आणि गाड्या रद्द केल्या असून, एनडीआरएफच्या 45 पथकांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले आहे. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) माहितीनुसार, धोकादायक चक्रीवादळ ‘मोंथा’ आता कमजोर होऊन चक्रीवादळाच्या स्वरूपात आंध्र प्रदेशच्या किनारी भागात सक्रिय आहे. गेल्या सहा तासांत ते उत्तर-पश्चिम दिशेने सुमारे १० किमी प्रति तासाच्या वेगाने सरकले असून, सध्या ते नरसापुरपासून २० किमी पश्चिम-उत्तर पश्चिम, मच्छलीपट्टनमपासून ५० किमी उत्तर-पूर्व आणि काकीनाडापासून ९० किमी पश्चिम-दक्षिण पश्चिम भागात केंद्रित आहे.

आयएमडीने सांगितले की, पुढील ६ तासांत या वादळाची तीव्रता कायम राहिल आणि नंतर ते ‘डीप डिप्रेशन’ म्हणजेच खोल दाब क्षेत्रात परिवर्तित होईल. ताज्या आकडेवारीनुसार, वादळाचा मागील भाग आता भूभागात प्रवेश केला आहे. आयएमडीने मंगळवार रात्री ९:३० वाजता दिलेल्या बुलेटिनमध्ये सांगितले की, ‘मोंथा’ उत्तर-पश्चिम दिशेने १५ किमी प्रतितासाच्या वेगाने पुढे सरकत होते. त्या वेळी ते मच्छलीपट्टनमपासून ६० किमी पूर्व, काकीनाडापासून १०० किमी दक्षिण-दक्षिण पश्चिम, विशाखापट्टणमपासून २३० किमी दक्षिण-पश्चिम आणि ओडिशाच्या गोपालपूरपासून ४८० किमी दक्षिण-पश्चिमेस केंद्रित होते. आयएमडीच्या मते, वादळाचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये तेलंगणा, तमिळनाडू, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांवरही दिसून येईल, जिथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, शेजारील ओडिशा राज्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री मोहन चरण मजही यांनी सांगितले की, राज्य सरकारने दक्षिण ओडिशातील आठ जिल्ह्यांमध्ये २,००० हून अधिक आपत्ती निवारण केंद्रे स्थापन केली आहेत. आतापर्यंत ११,३९६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.सरकारने देवमाली आणि महेन्द्रगिरी टेकड्यांसारख्या पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घातली असून, समुद्रकिनाऱ्यांवरील हालचाल मर्यादित केली आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांतील शाळा आणि अंगणवाडी केंद्रे ३० ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.ईस्ट कोस्ट रेल्वेने वॉल्टेयर विभाग आणि संलग्न मार्गांवरील अनेक गाड्या रद्द, मार्गबदल किंवा कमी अंतरापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या ३० ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. मच्छीमारांना २९ ऑक्टोबरपर्यंत ओडिशा किनाऱ्याजवळ किंवा बंगालच्या उपसागरात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech