रोहित पवारांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

0

एमएससीबी बँक गैरव्यवहाराचे प्रकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह काही जणांविरोधात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने ) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने रोहित पवार यांच्याविरोधात विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्राची अद्याप न्यायालयाकडून दखल घेण्यात आलेली नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.ईडीने आमदार रोहित पवार आणि इतर काही आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.यापूर्वी ईडीने याप्रकरणी बारामती ऍग्रो लि.च्या कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या (कन्नड एसएसके साखर कारखाना) ५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. तसेच रोहित पवार यांची गेल्यावर्षी चौकशीही करण्यात आली होती.त्यानंतर हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ईडीच्या तपासानुसार, रोहित पवार यांच्या बारमती ॲग्रो आणि अन्य कंपन्यांनी संगनमत करून कथित एमएससीबी गैरव्यवहार प्रकरणात संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा आरोप आहे. त्यात कन्नड एसएसके गिरणी ही रोहित वापर यांच्या बारामती ॲग्रो प्रा. लि. कंपनीने ५० कोटी रुपयांना विकत घेतली होती.यामध्ये १६१.३० एकर जमीन, साखर कारखाना, त्यातील मशीनरी आणि इमारत यांचा समावेश आहे. बारामती ॲग्रोने कन्नड एसएसके खरेदी करण्यासाठी लागलेल्या पैशांबाबत ईडी तपास करीत आहे. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, बारामती ॲग्रोने कन्नड एसएसकेसाठी बोली लावण्यासाठी हायटेकशी संगनमत केले आणि चुकीच्या पद्धतीने बोली जिंकण्यासाठी लिलाव प्रक्रियेत फेरफार केला, असा संशय आहे. याच उद्देशासाठी बारामती ॲग्रोने बोली प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आणि बारामती ॲग्रोपेक्षा कमी रकमेची बोली लावण्यासाठी काही रक्कम हायटेककडे हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech