मुंबई : मुंबईत कबुतरांना खाद्य घालण्यावर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीचा भंग करत गिरगाव चौपाटीवर एका व्यक्तीने तब्बल दहा गोण्या धान्य कबुतरांसाठी टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ७ ऑगस्ट रोजी पहाटे घडली असून, संबंधित व्यक्तीने स्वतःच या कृतीची ध्वनिचित्रफीत तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. ध्वनिचित्रफीतीत संबंधिताने, “गेल्या पाच-सहा दिवसांपासून कबुतरांना धान्य मिळालेले नाही, त्यामुळे मी त्यांना धान्य घालतोय” असे सांगत, एका स्वयंसेवी संस्थेचे नाव घेत मुंबईत रोज ३०० किलो धान्य आणले जाते, असा दावा केला आहे. व्हिडिओत मोठ्या संख्येने कबुतरांचे थवे धान्यावर तुटून पडतानाही दिसतात.
महापालिकेच्या तक्रारीवरून डी. बी. मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चित्रफीतीच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे. सध्या चौपाटीवर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत.यापूर्वी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर कारवाई केली होती. त्यानंतर पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीत न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केली आणि खाद्य देणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्याचे निर्देश नंतर राज्य सरकारकडून देण्यात आले होते.