मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले, तीन टायरचा स्फोट, जीवितहानी टळली

0

मुंबई : एअर इंडियाचे विमान एआय २७४४ ए३२० (व्हीटी-टीवायए) हे सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून भरकटल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकची माहिती अशी की, विमान हे केरळमधील कोची येथून मुंबईला येत होते. खराब हवामानामुळे विमान हे धावपट्टीवर उतरल्याबरोबर लगेच घसरले. हे विमान उतरत असताना त्याच्या तीन टायरचा स्फोट झाला, इतकेच नाही तर इंजिनचे देखील नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. या प्रकारानंतरही विमान सुरक्षितरीत्या टर्मिनल गेटपर्यंत पोहचले आणि सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप बाहेर पडले. सुदैवाने यावेळी मोठा अपघात टळला असून दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

एअर इंडियाने या घटनेबद्दल निवेदन जारी करून माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, २१ जुलै रोजी कोचीहून मुंबई जाणारे विमान एआय२७४४ याला लॅंडिंगदरम्यान मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. सकाळी जवळपास ९.२७ वाजता ही घटना घडली. धावपट्टीवर उतरताच विमान धावपट्टीवरून अयोग्यरित्या बाहेर पडले. मात्र विमान सुरक्षितपणे गेटपर्यंत पोहचले आणि त्यानंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स खाली उतरले. तपासणीसाठी विमान ग्राउंड करण्यात आले आहे. धावपट्टीवर झालेल्या या घटनेनंतर इमर्जन्सी टीम सक्रीय झाल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्व प्रवासी व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. एअरपोर्ट रनवेचे थोडे नुकसान झाले आहे. या दरम्यान दुसरा रनवे लगेच सक्रिय करण्यात आला. प्रवासी आणि क्रू यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. विमानतळ प्रशासनाकडून तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद पथकांना बोलवण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech