मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार जोडी सचिन-जिगर यातील संगीतकार सचिन संघवी याला एका १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे. या तरुणीने सचिनवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. विलेपार्ले पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०२४ मध्ये इंस्टाग्रामवर सचिन आणि पीडित तरुणीची ओळख झाली. “तुला संगीत अल्बममध्ये काम देतो,” असं सांगून सचिनने तिच्याशी संपर्क वाढवला. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि लग्नाचं आमिष दाखवत सचिनने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सचिन संघवीने त्या तरुणीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडलं, असंही नमूद करण्यात आलं आहे. सुरुवातीला विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासासाठी हे प्रकरण सांताक्रूझ पोलिसांकडे सोपवण्यात आलं. पोलिस तपासानंतर सचिन संघवीला अटक करण्यात आली. मात्र, काही तासांतच त्याला जामिनावर सुटका मिळाली.
कोण आहे सचिन संघवी ?
सचिन संघवी हा मूळचा गुजरातमधील असून सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. त्याने आतापर्यंत ए.आर. रहमान, अमित त्रिवेदी, अनु मलिक, नदीम-श्रवण, संदेश शांडिल्य अशा बॉलिवूडमधील अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केलं आहे. त्याच्या संगीत कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांतील गाण्यांना त्याने स्वर दिले आहेत. त्यात ‘जयंती भाई की लव्ह स्टोरी’, ‘हिम्मतवाला’, ‘ओह माय गॉड’, ‘तेरे नाल लव हो गया’, ‘क्या सुपर कूल है हम’, ‘अजब गजब लव्ह’, ‘एबीसीडी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘मी और मैं’, ‘गो गोवा गॉन’ आणि ‘रमैया वस्तावया’ यांचा समावेश आहे. या सर्व यशानंतर आता सचिन संघवीवरचे गंभीर आरोप त्याच्या कारकिर्दीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.