सोलापूर : लातूर येथील एका मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे आणि समतेचे दर्शन झाले. दगड फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणी सय्यद या मुस्लिम तरुणाने विठुरायाच्या चरणावर एक लाख रुपये किमतीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला.देव, देश आणि धर्म एक असल्याचा संदेशही सय्यद यांनी आपल्या कृतीतून दिला. मशिदीमध्ये जावून नमाज पठण करणारा गणी सय्यद थेट गाभाऱ्यात जाऊन विठुरायाच्या चरणावर लीन झाला. त्याच्या या अनोख्या विठ्ठल भक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या भक्तीने भारावलेल्या विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी त्याचा सत्कार केला.वारकरी संप्रदाय आणि श्री विठ्ठल हे समतेचा प्रतीक मानले जाते. याच विठ्ठलाचे सर्व धर्मीयांमध्ये भक्त आहेत. लातूर येथील मुस्लिम समाजातील गणी सय्यद हा देखील एक विठ्ठलभक्त आहे. विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे.