निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात मोर्चा
मुंबई : मतचोरी, मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार असून त्याची मोठी तयारी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसे, डाव्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असतील आणि मोर्चाला मार्गदर्शन करतील, अशी माहिती शिवसेना (उबाठा) नेते अनिल परब यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भात मविआ आणि मनसे यांच्या प्रमुख नेत्यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चाच्या संदर्भातील नियोजन चर्चा झाली. या बैठकीनंतर मविआच्या नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेत सत्याचा मोर्चा संदर्भात माहिती दिली. हा मोर्चा लोकशाही आणि सत्यासाठी असल्याचे परब यांनी सांगितले. हा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून सुरू होऊन मेट्रो सिनेमामार्गे मुंबई मनपा प्रवेशद्वाराजवळ थांबेल. या मोर्चाला लाखोंच्या संख्येत नागरिक येतील, अशी अपेक्षा परब यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाचा जो बेजबाबदार कारभार सुरू आहे. मतचोरी, मतांमधला घोळ, निवडणुकांमधला गैरव्यावहार या सगळ्यांच्या बाबतीतला ‘सत्याचा मोर्चा’ लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं, यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जे-जे या सर्व गोष्टींच्या विरोधात आहे, ते सर्व या मोर्चात सामील होतील. तसेच केवळ राजकीय पक्ष नाही तर ज्यांना आपलं मत चोरीला गेलंय असं वाटतंय आणि ज्या चुकीच्या मतांवर हे सरकार बसलंय असे लोकं देखील या मोर्चात सहभागी होतील.
या मोर्चाच्या संबंधामध्ये आम्ही पोलिसांना भेटलो असून त्यांच्याकडून आवश्यक त्या सूचना घेतल्या आहेत. आम्ही मोर्चाचे रुट प्रसिद्धी करता दिले असून क्यूआर कोड माध्यमांकडे पाठवण्यात येतील. जेणेकरून मोर्चात येणाऱ्या लोकांची सर्व व्यवस्था होईल. तसेच हा मोर्चा अतिशय शांतपणे पार पडले. या मोर्चामध्ये प्रमुख नेते मतचोरीच्या बाबतीत किंवा मतदारयादीतील जो घोळ आहे, त्यासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा मोर्चात ठरवतील, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. सर्वसाधारण मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा शनिवारी आयोजित केला आहे. तसेच जी कार्यालये खुली असतील त्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून दुपारी १ ते ४ या दरम्यान हा मोर्चा आयोजित केल्याचेही परब यांनी स्पष्ट केले.