दुबेंचा मुंबईत कोट्यावधींचा फ्लॅट
पाटणा : महाराष्ट्राचं या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे, ही गोष्ट कोणीही नाकारु शकत नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. पण महाराष्ट्र जो टॅक्स भरतो, त्यामध्ये आमचंही योगदान आहे. याचं ठाकरे कुटुंबाशी, मराठी लोकांशी देणं घेणं नाही. तामिळनाडू, केरळ किंवा कर्नाटक कुठेही जा. तेदेखील ‘पटक पटक के मारेंगे’ म्हणतील. त्यामुळे माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. ते आज, माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो. तिकडे टाटा, बिर्ला आणि रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं? टाटा, बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात, पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता. तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओडिसात आहेत. रिलायन्सची रिफायनरी आणि सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचं शोषण करुन दादागिरी करता, असेही दुबे यांनी म्हटलं आहे
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्या संदर्भात सातत्याने बोलणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा मुंबईतील खार पश्चिमेत कोट्यावधींचा फ्लॅट आहे. महाराष्ट्राकडे कोणतेही उद्योग नाही, म्हणणारे खासदार दुबे राजकारणात जाण्यापूर्वी स्वत:च मुंबईतील बड्या कॉर्पोरेट कंपनीत संचालक पदावर होते. १९९३ ते २००९ पर्यंत मुंबईत मुख्यालय असणाऱ्या स्टील, दूरसंचार, ऊर्जा या क्षेत्रांशी संबंधित काम करणाऱ्या कंपनीत दुबे यांनी व्यवस्थापनातील सर्वोच्च पदे भूषवली होती. तसेच खार पश्चिमेला त्यांच्या नावावर उच्चभ्रू परिसरात १६८० चौरस फुटांचा कोट्यावधींचा फ्लॅट आहे.