जांभूळखेडा भूसुरूंग स्फोटात १५ जवानांचा घेतला होता जीव
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे येथे सुरक्षा दलांना जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे. मन्नू सुलगे पल्लो उर्फ अंकल असे या नक्षलवाद्याचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील कवंडे गावचा रहिवासी आहे. जांभूळखेडा येथे ६ वर्षांपूर्वी झालेल्या भूसुरूंग स्फोटात याचा हात होता. त्या हल्ल्यात १५ जवान हुतात्मा झाले होते. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी २७ जून रोजी भामरागड तालुक्यामधील कवंडे येथे पोलिस पथक आणि राज्य राखीव दलाच्या बटालियनचे पथक गस्तीवर असताना त्यांना एक संशयित इमक टेहाळणी करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो नक्षलवाद्यांच्या कोरची दलमचा उपकमांडर मन्नू सुलगे पल्लो उर्फ अंकल असल्याचे निष्पन्न झाले.
मन्नू पल्लो उर्फ अंकल वयाच्या १३ व्या वर्षी नक्षल चळवळीत दाखल झाला. छत्तीसगडमधील माओवाद्यांच्या निब कंपनीतून सदस्य पदावर भरती झाला. २०१७ मध्ये तो भामरागड दलममध्ये बदली होऊन आला. त्यानंतर त्याने कोरची दलममध्ये उपकमांडर म्हणून काम केले. तर २०२० पासून तो महाराष्ट्र -छत्तीसगड सीमेवर कवंडे जंगल परिसरात राहून माओवादी चळवळीत काम करायचा. गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा जंगलात २ मे २०१९ रोजी झालेल्या भुसुरुंग स्फोटात १५ जवानांनी हौतात्म्य पत्करले होते. या हल्ल्यामध्ये मन्नू पल्लो याचा सक्रिय सहभाग होता. यासोबतच खोब्रामेंढा जंगलात २९ मार्च २०२१ रोजी झालेल्या चकमकीतही तो सामील होता. त्याच्यावर शासनाने ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. मन्नू याला कुरखेडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याला आज, शनिवारी कुरखेडा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले असता कोर्टाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.