एनडीएकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित

0

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रविवारी जाहीर केले की, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्यासाठी नामांकनाची अंतिम तारीख २१ ऑगस्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवाराचे नाव अंतिम करण्यासाठी भाजप संसदीय मंडळाची रविवारी बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे अनेक दिग्गज या बैठकीला उपस्थित होते.

सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्यबळ बघता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. भाजपकडे लोकसभेत २४० आणि राज्यसभेत १०२ खासदार आहेत. ससदेतील एनडीएच्या पक्षांचं मिळून ४५७ खासदार सत्ताधाऱ्यांकडे आहेत. यामुळे एनडीएचे उमेदवार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवणार हे स्पष्ट आहे. दुसरीकडे इंडी आघाडीकडील पक्षीय बलाबल पाहिल्यास काँग्रेसकडे लोकसभेत ९९ आणि राज्यसभेत २७ खासदार आहेत. इंडी आघाडीच्या दोन्ही सभागृहातील खासदारांची संख्या ३०० पेक्षा अधिक आहे. मात्र, या संख्याबळावर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळणं अशक्य आहे.

राज्यसभेत भाजपचं संख्याबळ पुन्हा एकदा १०० पेक्षा जास्त झालं आहे. राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून काही दिवसांपूर्वी उज्ज्वल निकम, हर्षवर्धन श्रृंगला आणि सी. सदानंदन मास्टर यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली होती. त्यामुळे भाजपची सदस्यसंख्या १०२ झाली आहे. राज्यसभेत एनडीएकडे १३४ खासदार आहेत. यामध्ये पाच खासदार राष्ट्रपती नियुक्त आहेत. राज्यसभेची सदस्यसंख्या २४५ इतकी आहे. त्यामुळं सभागृहातील बहुमताचा आकडा १२३ इतका होतो. राज्यसभेची राज्यघटनेनुसार सदस्यसंख्या राज्यांमधून आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडली जाणारी २३८ आणि राष्ट्रपती नियुक्त सदस्य १२ अशी एकूण २५० इतकी आहे.

चंद्रपुरम पोन्नूस्वामी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे असून सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांनी ३१ जुलै २०२४ रोजी राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली होती. यापूर्वी त्यांनी १८ फेब्रुवारी २०२३ ते ३० जुलै २०२४ दरम्यान झारखंडचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहिले. तसेच, मार्च ते जुलै २०२४ या काळात तेलंगणाचे राज्यपाल आणि मार्च ते ऑगस्ट २०२४ दरम्यान पाँडिचेरीचे उपराज्यपाल या पदांचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला होता. आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात राधाकृष्णन यांनी संघटनात्मक तसेच प्रशासकीय स्तरावर अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. आता ते उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरत असून एनडीएच्या विजयी मोहिमेत त्यांची भूमिका निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech