काठमांडू : नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शानांच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीय नागरिक नेपाळमध्ये अडकले असून त्यांना तिथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत तसेच व्यवसाय व कामाच्या निमित्ताने ये-जा करत असतात. सध्याच्या हिंसक परिस्थितीमुळे अनेक भारतीय परत भारतात यायला इच्छुक आहेत. मात्र, खराब होत चाललेल्या परिस्थितीमुळे भारत सरकारने सीमारेषेवर सुरक्षा कडक केली आहे. लोकांचे कागदपत्र तपासले जात आहेत, त्यामुळे हजारो भारतीय नेपाळमध्ये अडकले आहेत.
राजस्थानचे सुमारे ४००० प्रवासी काठमांडू व आजूबाजूच्या भागांमध्ये अडकले आहेत. त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशचे १८७ लोक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती आहे. नेपाळमधील भारतीयांसाठी भारतीय दूतावास (काठमांडू) आणि संबंधित राज्य सरकारांकडून हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक निदर्शने पाहता केंद्रीय यंत्रणांनी भारत-नेपाळ सीमा भागात सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. यामध्ये सावध करण्यात आले आहे की, उपद्रवी घटक या अस्थिरतेचा फायदा घेत सीमावर्ती भारतीय राज्यांमध्ये हिंसाचार भडकवू शकतात. गुप्तचर सूत्रांनी इशारा दिला आहे की, नेपाळमधील अस्थिर वातावरणाचा फायदा घेत असामाजिक तत्वे भारतीय सीमावर्ती राज्यांमध्ये हिंसा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू शकतात.
अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, या गुप्त माहितीच्या आधारे उत्तराखंड पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस, बिहार पोलीस आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये १,७५१ किलोमीटर लांब खुल्या सीमारेषेवर कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये म्हणून सुरक्षा उपाय आणखी कडक करण्यात आले आहेत.