नवी दिल्ली : श्रीहरीकोटा येथून ३० जुलै रोजी सायंकाळी ५:४० वाजता “निसार” (निसार-नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार) या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे. हे प्रक्षेपण इस्रो आणि अमेरिकेच्या नासा यांच्यातील पहिली संयुक्त पृथ्वी निरीक्षण मोहीम असून ही मोहीम भारत-अमेरिका अंतराळ सहकार्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हे मिशन भारताच्या जीएसएलव्ही -एफ १६ रॉकेट द्वारे प्रक्षेपित केले जाईल. असे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “निसार मोहीम ही फक्त एक उपग्रह प्रक्षेपण नाही, तर दोन लोकशाही राष्ट्रांनी विज्ञान आणि जागतिक कल्याणासाठी केलेल्या सहकार्याचे प्रतीक आहे. हे मिशन भारत आणि अमेरिका यांसह संपूर्ण जगासाठी आपत्ती व्यवस्थापन, कृषी आणि हवामान निरीक्षण यासारख्या क्षेत्रात अमूल्य डेटा पुरवेल.” , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विश्व बंधु’ या दृष्टीकोनाशी सुसंगत अशा या मोहिमेमुळे भारत मानव हितासाठी योगदान देणारा जागतिक भागीदार म्हणून उदयास येत आहे.
निसार मोहिमेच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो. दोन्ही संस्थांचे (इस्रो आणि नासा) प्रगत तंत्रज्ञानाचे योगदान उत्पन्न होणारा सर्व डेटा एक ते दोन दिवसांत, तसेच आपत्कालीन परिस्थितीत जवळजवळ तत्काळ, विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे. डेटाच्या सार्वत्रिकीकरणामुळे विशेषतः विकासशील देशांसाठी वैज्ञानिक संशोधन आणि धोरणात्मक निर्णयप्रक्रियेला मदत होणार आहे.
डॉ. सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे अंतराळ कार्यक्रम पारंपारिक उपयुक्तता आधारित मिशनकडून अशा दिशेने वाटचाल करत आहेत जे जागतिक सामायिक संसाधनात ज्ञान योगदान देणारे म्हणून पुढे येत आहेत. “निसार हा केवळ एक उपग्रह नाही, तर भारताचा जगाशी विज्ञानाच्या माध्यमातून सहयोग आहे,” असे त्यांनी शेवटी नमूद केले.