संसद भवनात मराठी महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना घेरले

0

‘जय महाराष्ट्र’ म्हणत काढला पळ- संजय राऊतांसह मनसे नेत्यांकडून स्वागत

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद आता दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही मराठी महिला खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले आणि जाब विचारला. त्यावेळी निशिकांत दुबे यांनी जय महाराष्ट्र बोलत तिथून पळता पाय काढला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सध्या सुरु आहे. यातच काल, बुधवारी लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर निशिकांत दुबे लॉबीमध्ये येताच वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव या मराठी खासदारांनी त्यांना घेरले. यावेळी मराठी भाषिकांविरोधातली तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही कुणाला आणि कसे आपटून आपटून मारणार?, तुमचे वागणे योग्य नाही, असं काँग्रेसच्या महिला खासदारांनी सुनावलं. यानंतर वर्षा गायकवाड यांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. त्यावर आप तो मेरी बहन है, असं म्हणत निशिकांत दुबे हात जोडून तिकडून निघून गेले.

याबाबत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, संसद भवनाच्या लॉबीत निशिकांत दुबे यांना आम्ही रोखले, तिथे तुम्ही महाराष्ट्राबाबत आक्षेपार्ह विधान का केले याचा जाब विचारला. तुम्ही कोणाला आपटून आपटून मारणार आहात हे विचारले. काँग्रेस महिला खासदारांचा आक्रमक पवित्रा पाहून निशिकांत दुबे यांनी तिथून नाही, नाही, जय महाराष्ट्र, असं म्हणत काढता पाय घेतला. सध्या घडलेल्या या प्रकाराची संसदेत बरीच चर्चा सुरू आहे. ही सर्व घटना संसद लॉबीतील कॅन्टीनजवळ घडली.

दरम्यान, महाराष्ट्राची बदनामी होतेय, त्यामुळे आमच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना जाब विचारला. तुम्ही काय केले. दुबेला अडवले. तुमच्यात हिंमत आहे का असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. तर पक्षभेद विसरून मराठी म्हणून आपण एकत्र येतोय, महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्याचे आम्ही स्वागत करतो, असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक केले.

दरम्यान काँग्रेसच्या महिला खासदारांच्या या भूमिकेचं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी कौतुक केले आहे. मराठीचा आवाज बुलंद केल्यामुळे मी तिन्ही भगिनींचे आभार मानतो. यासाठी धाडस लागतं आणि हे तिन्ही महिलांनी दाखवलं, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. सदर महिला जेव्हा अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघात येतील, तेव्हा मनसेकडून या महिला खासदारांचा सत्कार करण्यात येईल, असंही जाधव यांनी सांगितले. आम्हाला पुरुष खासदारांकडून अपेक्षा होती ते काहीतरी करतील. मात्र त्यांनी काहीच केलं नाही. वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव या खासदार मराठीसाठी पुढे उभ्या राहिल्या. आज या महिला खासदार मराठीसाठी उभ्या राहिल्या वेळ आली तर आम्ही देखील त्यांच्यासाठी नक्की उभे राहू. भाजपच्या खासदारांकडून अपेक्षा नाही. शिवसेना शिंदे गटाचे खासदार काय करतात बघूया, अजून लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. मराठीची बाजू संसदेत मांडतात की नाही, हिंदी सक्तीबाबत काय बोलतात, बघूया, असंही ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech