पाटणा : भारतावर हल्ला करून कोणताही दहशतवादी वाचू शकत नाही, असे विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना कठोर संदेश दिला आहे. ते शुक्रवारी(२२ ऑगस्ट) बिहारच्या गया येथे केलेल्या भाषणात बोलत होते. पुढे पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत सांगितले की, बिहारच्या भूमीवर घेतलेला संकल्प कधीच व्यर्थ जात नाही. यावेळी पंतप्रधान मोदींनी गया येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही केले.
बिहारमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “जेव्हा भारताला कुणी शत्रू देशाने आव्हान दिले, तेव्हा बिहार देशाचे ढाल बनून उभा राहिला. बिहारच्या पवित्र भूमीवर घेतलेला संकल्प कधीच वाया जात नाही. जेव्हा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, आपले निष्पाप नागरिक केवळ धर्म विचारून मारले गेले, तेव्हा मी या बिहारच्या भूमीवरूनच दहशतवाद्यांना जमिनीत गाडून टाकण्याची प्रतिज्ञा घेतली होती. आज जग बघत आहे की, बिहारच्या भूमीवर घेतलेला तो संकल्प पूर्ण झाला आहे.”
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, “पाकिस्तानची एकही मिसाइल भारताला इजा पोहोचवू शकली नाही. ऑपरेशन सिंदूरने भारताच्या संरक्षण धोरणाला एक नवीन दिशा दिली आहे. भारतात दहशतवादी पाठवून हल्ले घडवून आणणारे कोणीही वाचू शकणार नाहीत. दहशतवादी अगदी पाताळात लपले तरी भारताच्या क्षेपणास्त्रांनी त्यांना तेथेच संपवले जाईल.”
पंतप्रधान पुढे म्हणाले,”बिहारचा जलद विकास ही एनडीए सरकारची प्राथमिकता आहे. म्हणूनच बिहारचा सर्वत्र विकास होत आहे. पूर्वी संध्याकाळी बिहारमध्ये कुठेही जाणे कठीण होते. कंदील राजवटीत गयाजीसारखी शहरे अंधारात बुडालेली असायची. शिक्षण नव्हते की रोजगार नव्हता. बिहारच्या किती पिढ्यांना या लोकांनी स्थलांतर करण्यास भाग पाडले.” ‘राजद आणि त्यांचे मित्र पक्ष बिहारींना फक्त त्यांची मतपेढी मानतात. त्यांना त्यांच्या सुख, दुःख आणि आदराची पर्वा नाही. एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून म्हटले होते की ते बिहारमधील लोकांना आत येऊ देणार नाहीत. बिहारमधील लोकांबद्दल इतका द्वेष सहन करण्यासारखा नाही.’
पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले, “माझा एक मोठा संकल्प आहे. जोपर्यंत प्रत्येक गरजू व्यक्तीला पक्के घर मिळत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. गेल्या ११ वर्षांमध्ये ४ कोटींपेक्षा अधिक गरीबांना पक्की घरे देण्यात आली आहेत. बिहारमध्येही मोठ्या प्रमाणात पक्की घरे बांधण्यात आली आहेत. गया मध्ये २ लाख लोकांना पक्के घरे मिळाली आहेत.” पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजच गया या पवित्र भूमीवरून १२ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे एकाच दिवशी लोकार्पण आणि भूमिपूजन झाले आहे. यामध्ये ऊर्जा, आरोग्य आणि शहरी विकासाशी संबंधित अनेक मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे बिहारमधील उद्योगांना चालना मिळेल आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. या सर्व प्रकल्पांसाठी बिहारच्या जनतेचे अभिनंदन करतो.”