मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरु केलेल्या आमरण उपोषणाला आज तिसरा दिवस झाला आहे. “आरक्षण मिळेपर्यंत उठणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतल्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला आहे. दुसरीकडे त्यांच्या मागणीला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ ‘अॅक्शन मोड’वर आले असून उद्या, 1 सप्टेंबर रोजी त्यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक मुंबईत बोलावली आहे.
या बैठकीत ओबीसी आरक्षणाचे संभाव्य परिणाम, मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर ओबीसी समाजाची भूमिका आणि भविष्यातील आंदोलनाची शक्यता यावर सविस्तर चर्चा होणार आहे. बैठकीनंतर ओबीसी समाजातील प्रमुख नेते एकत्रित पत्रकार परिषद घेणार असून, या पत्रकार परिषदेत ओबीसी समाजाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. विशेषतः हैदराबाद गॅझेट, सातारा आणि औंध गॅझेट या संदर्भातील हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टाचे आदेश मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात असून, छगन भुजबळ नेमके कोणते मुद्दे उपस्थित करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना उद्या मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीतून पुढील आंदोलनाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे. सध्यातरी ओबीसी नेत्यांची भूमिका “मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये” अशीच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणाने तापलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता ओबीसी नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सरकार, मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यातील ताणतणाव वाढत असतानाच ही बैठक आणि पत्रकार परिषद राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापवणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.