नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान सांगितले की, दहशतवादाविरुद्ध भारताकडून हा एक निर्णायक आणि स्पष्ट संदेश आहे की, भारत ‘शून्य सहनशीलता’च्या धोरणावर उभा आहे. सिंह म्हणाले की, ही लष्करी कारवाई पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी करण्यात आली होती. ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षक आणि हँडलर मारले गेले.
संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय दबावाखाली भारताने ही कारवाई थांबवली असे म्हणणे निराधार आणि पूर्णपणे चुकीचे आहे. ते म्हणाले, “माझ्या राजकीय आयुष्यात मी खोटे न बोलण्याचा प्रयत्न केला आहे.” ते म्हणाले की, या कारवाईचा उद्देश केवळ लष्करी कारवाई नव्हता तर भारताची सार्वभौमत्व, ओळख आणि नागरिकांप्रती सरकारची जबाबदारी दाखवणे हा होता. ही कारवाई ६-७ मे च्या रात्री सुरू झाली आणि अवघ्या २२ मिनिटांत पूर्ण झाली.
राजनाथ सिंह म्हणाले की, २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह २५ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना ठार मारले होते. जे मानवतेविरुद्धचे सर्वात घृणास्पद कृत्य आहे. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि त्यांना आवश्यक स्वातंत्र्य दिले. त्यानंतर भारतीय सैन्याने “ऑपरेशन सिंदूर” ची योजना आखली आणि ती यशस्वीरित्या राबवली.
राजनाथ सिंह म्हणाले की, या कारवाईनंतर भारताने हॉटलाइनद्वारे पाकिस्तानला संदेश पाठवला की, ही कारवाई मर्यादित आहे आणि ती वाढवण्याचा कोणताही हेतू नाही. त्यांनी यावर भर दिला की. भारताने केलेली ही कारवाई पूर्णपणे स्वसंरक्षणार्थ होती. ती चिथावणीखोर किंवा विस्तारवादी नव्हती. तरीही १० मे रोजी पाकिस्तानने भारतावर मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि रॉकेटचा समावेश होता.
सिंह यांनी लोकसभेला आश्वासन दिले की, एस-४००, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि ड्रोनविरोधी प्रणाली यासारख्या अत्याधुनिक संरक्षण उपकरणांच्या मदतीने भारताने पाकिस्तानचा हा हल्ला पूर्णपणे हाणून पाडला. पाकिस्तान भारताच्या कोणत्याही महत्त्वाच्या मालमत्तेचे नुकसान करू शकला नाही. संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय दबावाखाली भारताने ही कारवाई थांबवली असे म्हणणे निराधार आणि पूर्णपणे चुकीचे आहे. ते म्हणाले, माझ्या राजकीय आयुष्यात मी खोटे न बोलण्याचा प्रयत्न केला आहे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, भारतीय सैन्याने दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई कशी केली हे संपूर्ण जगाने पाहिले.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, यावर व्यवसाय सल्लागार समितीमध्ये विहित प्रक्रियेनुसार चर्चा केली जात आहे. राजनाथ सिंह यांनी सभागृहातील शूर पुत्रांना सलाम केला आणि सांगितले की, जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा भारतीय सैनिक राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी मागे हटले नाहीत.
 
								
				 
					
										
												
				 
	
											 
	
											