नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हिंदूंच्या टार्गेट किलींगनंतर पाकिस्तान विरोधात सुरू केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ गेम चेंजर ठरल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. राज्यसभेत आज, मंगळवारी ‘ऑपरेशन सिंदूर’ वरील चर्चेत सहभागी होताना ते बोलत होते. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हिंदू पर्यटकांच्या नरसंहाराला जबाबदार असलेल्या ३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी सोमवारी खात्मा केला. या कामगिरीसाठी राजनाथ यांनी भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांचे यासाठी कौतुक केले.
ऑपरेशन सिंदूर भारताच्या “झीरो-टॉलरन्स” धोरणाला बळकटी देतो. हे ऑपरेशन केवळ सध्याच्या आव्हानांना उत्तर देत नाही, तर भारताचे भविष्य सुरक्षित करण्यासाठीही महत्त्वाचे आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “ऑपरेशन सिंदूरला पूर्णविराम नाही, फक्त अल्पविराम आहे.” पाकिस्तानकडील अण्वस्त्रांच्या धोक्याबाबत बोलताना “नागपंचमीला नागांना दूध पाजणे ठीक आहे, पण रोजच नाही.” असा टोला राजनाथ यांनी लगावला.
संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, ऑपरेशन सुरू करण्याआधी सखोल अभ्यास केला गेला जेणेकरून दहशतवाद्यांवर निशाना साधता येईल आणि पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना हानी पोहोचू नये.त्यांनी सांगितले की, भारताची भूमिका अशी आहे की “ईंट का जवाब पत्थर से दिला जाईल.” कोणत्याही राष्ट्राची प्रतिक्रिया त्याच्या स्वभावावर आधारित असते, आणि तीच प्रतिक्रिया त्याच्या चरित्रावर प्रभाव टाकते, म्हणून भविष्यातील परिणाम लक्षात घेऊनच निर्णय घ्यायला हवेत.
जसे भगतसिंग आणि चंद्रशेखर आजाद यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला, त्याचप्रमाणे आपण आपला स्वाभिमान जपत आहोत. तब्बल ८०० वर्षांच्या गुलामीनंतर भारताला शांतप्रिय आणि कमजोर समजले जात होते. परंतु, ऑपरेशन सिंदूरने भारताची प्रतिमा बदलली आहे. दहशतवाद्यांना भारत “सॉफ्ट स्टेट” वाटत होता, जिथे कमी खर्चात मोठा नफा मिळतो. परंतु, आताच्या धोरणामुळे ही समजूत मोडून पडली आहे. त्यांनी शेवटी सांगितले की, विरोधकांना सरकारच्या धोरणांवर टीका करण्याचा अधिकार आहे, पण त्याबदलीत पर्यायही द्यायला हवेत असे राजनाथ यांनी सांगितले.