“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर

0

मुंबई : “माझ्यावर दबाव होता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना अटक करावी आणि भगवा आतंकवाद सिद्ध करावा. हा संपूर्ण प्रकार एक प्रकारचे षडयंत्र असल्यामुळे मी त्याला विरोध केला.” असा धक्कादायक खुलासा मालेगाव स्फोट प्रकरणातील तत्कालीन एटीएस पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी केला. तब्बल १७ वर्षांनंतर या प्रकरणातील न्यायालयीन निकालानंतर ते पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांसमोर ही माहिती दिली.

मालेगावमधील भिक्खू चौकात १९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, १०० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा निकाल काल (३१ जुलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. न्यायालयाने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली, ज्यामध्ये आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ राहिरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदयभान धर द्विवेदी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांचा समावेश होता.

महिबूब मुजावर यांच्या मते, तत्कालीन एटीएस प्रमुख परमवीर सिंह यांनीच त्यांना तपास चुकीच्या दिशेने वळवण्याचे आदेश दिले. त्यांनी सांगितले की, “संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा हे दोघे मरण पावलेले होते, पण तरीही त्यांना जिवंत दाखवून तपास पुढे नेण्याचा आदेश आला होता.”त्यांनी पुढे म्हटलं, “तत्कालीन सरकारनेही हेच खोटं उचलून धरलं आणि त्यांच्या नावाचा समावेश चार्जशीटमध्ये केला. मी विरोध केला, म्हणूनच माझ्यावर अनेक खोट्या केसेस लावण्यात आल्या. पण मी शेवटी निर्दोष मुक्त झालो,” असा ठाम दावा त्यांनी केला.महिबूब मुजावर यांच्या या वक्तव्यानंतर तपास प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि सरकारी हस्तक्षेपावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. न्यायालयीन निकाल आणि मुजावर यांचे खुलासे पाहता या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech