जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचा आरोप असून त्यांनी कोरेगाव पार्कमधील १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय. यावरून विरोधकांनी अजित पवारसह सरकारला घेरलं असून अशातच शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत या जमीन प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी झाली आहे. ही जमीन महारवतनाची आहे आणि अशा जमिनीच्या खरेदीसाठी महसूल आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. मात्र, या व्यवहारात अशी कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा व्यवहार बेकायदा असल्याचे स्पष्ट होत असून तो तत्काळ रद्द केला पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली.
खडसे यांनी आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की, या कंपनीचे भागभांडवल केवळ एक लाख रुपये आहे, मग ३०० कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यासाठी इतका मोठा निधी आला कुठून? कोणत्या खात्यातून पैसे दिले गेले आणि हे पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले, हे तपासणं आवश्यक आहे. दुसरं असं आहे, जी स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे, ती करताना जी कागदपत्रं दिली आहेत. ती कागदपत्रंच बनावट आहेत. या ठिकाणी महसूल आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे सरकारने हा व्यवहार तात्काळ रद्द करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करावी असं एकनाथ खडसे म्हणाले.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. हे प्रकरण अजित पवार यांच्या मुलाचं आहे. मी महसूलमंत्री असताना माझ्या परिवाराचं सांगण्यात आलं होतं.या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचा प्रत्यक्ष संबंध येतो. त्यामुळं चौकशी समिती काय करेल, असं सांगता येत नाही. सरकारचं सरकारच्या मुलाची चौकशी करेल आणि त्यातून काही तथ्य बाहेर येईल असं नाही. या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात यावी, त्यातून गौडबंगाल बाहेर आलं पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
जोपर्यंत चौकशी होत नाही, तथ्य बाहेर येत नाही तोपर्यंत अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट खरी आहे. चौकशीत प्रशासनिक कारवाई होईल. या व्यवहार ज्याच्या आशीर्वादानं झाला त्याच्यावर काय कारवाई करणार आहात, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केली.