* दहशतवादाचे समर्थन करणारे असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती
मुंबई : आझाद मैदानात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्चाला अखेर मुंबई पोलिसांनी अनुमती नाकारली असून मोर्चा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचे संभाव्य संकट टळले आहे. या निर्णयामुळे सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्नशील हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश मिळाले, तर समाजात धार्मिक तेढ माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद समर्थक पॅलेस्टाईनप्रेमी गटाचा स्पष्ट पराभव झाला आहे. या संदर्भात मोर्चाच्या माध्यमातून दहशतवादाचे समर्थन करण्याचा प्रयत्न होता, असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत, अशी भूमिका हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी मांडली.
मुंबई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी सदर मोर्चास परवानगी नाकारली. वर्ष २०१२ मधील आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्यासे समजते. त्या वेळी म्यानमार प्रकरणाच्या निषेधार्थ काढण्यात आलेला मोर्चा हिंसक दंगलीत रूपांतरित झाला होता. तशीच परिस्थिती पुन्हा या मोर्चाच्या माध्यमांतून उद्भवण्याची शक्यता होती.
या मोर्च्याला विरोध करण्यासाठी काल हिंदु राष्ट्र समन्वय समिती, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, भाजप, शिवसेना (शिंदे गट), हिंदु एकता जागृत समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, मानव सेवा प्रतिष्ठान आणि भूमीपूत्र सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे मुंबई पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांची मुख्यालयात भेट घेऊन मोर्चाला अनुमती देऊ नये, अशी मागणी केली होती. ‘हमास’सारख्या क्रूर दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या व हमासच्या हिंसाचारावर मौन बाळगणाऱ्या या मोर्चावर बंदी घालावी, अशी ठाम मागणी या संघटनांनी केली होती.