पंतप्रधानांच्या हस्ते ५१ हजारांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण

0

देशभरातील ४७ ठिकाणी आभासी पद्धतीने केले वाटप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी सोळाव्या रोजगार मेळाव्याअंतर्गत देशभरातील ४७ ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ५१ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे वितरीत केली. यावेळी मोदींनी या तरुणांना “राष्ट्र उभारणीचे सैनिक” असे संबोधित केले. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, या तरुणांची नियुक्ती “कोणत्याही खर्चाशिवाय” झालेल्या पारदर्शक प्रक्रियेचा एक भाग आहे. हा रोजगार मेळावा केंद्र सरकारच्या धोरणाचा एक भाग आहे, ज्या अंतर्गत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि भरती प्रक्रिया वेगवान करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

देशात २२ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १० लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या नवनियुक्त तरुणांना रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, टपाल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा आणि औद्योगिक विकास अशा विविध विभागांमध्ये तैनात केले जाईल. पंतप्रधान म्हणाले, “विभाग वेगवेगळे असू शकतात, परंतु तुमचे उद्दिष्ट एक आहे – देशाची सेवा करणे आणि विकसित भारत निर्माण करणे.” त्यांनी तरुणांना पुढील २० ते २५ वर्षे त्यांच्या कारकिर्दीशी आणि देशाच्या विकसित भारताच्या ध्येयाशी जोडण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) अलिकडच्या अहवालाचा हवाला देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दशकात 90 कोटींहून अधिक लोक सरकारच्या कल्याणकारी योजनांशी जोडले गेले आहेत, ज्यामुळे केवळ सामाजिक सुरक्षा वाढली नाही तर लाखो नवीन नोकऱ्याही निर्माण झाल्या आहेत.

पंतप्रधानांनी खाजगी क्षेत्रात रोजगार निर्मितीवरही भर दिला. त्यांनी माहिती दिली की सरकारने अलीकडेच ‘रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना’ मंजूर केली आहे, ज्या अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना १५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेसाठी १ लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे सुमारे ३.५ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आणि हे आपल्या तरुणांच्या कठोर परिश्रमाचे परिणाम आहे.” रोजगार मेळाव्यात निवड झालेल्या तरुणांना पुढील प्रशिक्षणासाठी कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या १४०० हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रमांशी जोडले जाईल, जेणेकरून ते त्यांच्या नोकऱ्यांमध्ये अधिक कार्यक्षम बनू शकतील असा विश्वास व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech