नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पाच देशांचा दौरा करून परतले. त्यांच्या या दौऱ्यावरुन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान प्रश्न उपस्थित करत टिका केली. मुख्यमंत्री मान म्हणाले की, पंतप्रधान अशा देशांमध्ये जातात, ज्यांची नाव कोणालाही माहिती नसतात.यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने मान यांच्या टिप्पण्या बेजबाबदार आणि खेदजनक असल्याचे म्हटले आहे आणि म्हणाले की, यामुळे भारताचे मित्र देशांसोबतचे संबंध बिघडू शकतात. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले, “आम्ही एका उच्च राज्य प्राधिकाऱ्याने ग्लोबल साउथमधील मैत्रीपूर्ण देशांबरोबर भारताच्या संबंधांबाबत काही टिप्पण्या केल्या असल्याचे पाहिले आहे. या टिप्पणी गैरजबाबदार आणि खेदजनक आहेत आणि कोणत्याही सरकारी प्राधिकाऱ्याला शोभणाऱ्या नाहीत.”
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले होते की, पंतप्रधान मोदी पुन्हा कुठेतरी गेले आहेत, असं वाटतंय की यावेळी ते घानाला गेले असावेत. माहिती नाही, कुठे-कुठे जात राहतात — ‘मॅग्नेसिया’, ‘गॅल्वेसिया’, ‘टार्वेसिया’ अशा जागांवर जातात. भगवंत मान यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात या दौऱ्यांची थट्टा करण्यासाठी अशा काल्पनिक नावांचा वापर केला होता. ते पुढे म्हणाले की, १४० कोटी लोकसंख्येच्या देशात राहणं त्यांना आवडत नाही. ते अशा ठिकाणी जात आहेत जिथे फक्त १०,००० लोक राहतात आणि तिथे त्यांना सर्वोच्च पुरस्कार दिले जात आहेत. इथे तर १०,००० लोक जेसीबी पाहण्यासाठी सुद्धा एकत्र येतात.