‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा’चे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) आणि मुंबई मेट्रो लाईन-3 (एक्वा लाईन) च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेला हा विमानतळ भविष्यात मुंबईतील गर्दीचे प्रमाण कमी करण्यास मदत करणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित होते. हे विमानतळ ‘डी. बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नावाने ओळखले जाईल.विमानतळाच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधानांनी मुंबई मेट्रो लाईन-3 च्या शेवटच्या टप्प्याचाही लोकार्पण सोहळा पार पाडला. या नव्या विमानतळावरून ऑक्टोबरच्या अखेरीस तिकीट विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांच्या सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असतील.

पंतप्रधान ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असून, या दरम्यान अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करतील तसेच जनसभेला संबोधित करतील. दौऱ्यादरम्यान ते ब्रिटनचे पंतप्रधान सर कीअर स्टार्मर यांची भेट घेणार असून, भारत-ब्रिटन संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे १९ हजार ६५० कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेला एनएमआयए हा भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत विकसित करण्यात आलेला हा विमानतळ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा (सीएसएमआयए) सोबत कार्य करत मुंबई महानगर क्षेत्राला दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून सेवा देईल.

एकूण ११६० हेक्टर क्षेत्रफळावर उभारलेला हा विमानतळ दरवर्षी ९० मिलियन प्रवासी आणि ३.२५ मिलियन मेट्रिक टन कार्गो हाताळण्याची क्षमता ठेवतो. स्वयंचलित पीपल मूव्हर (एपीएम) या प्रणालीद्वारे चारही प्रवासी टर्मिनल्स परस्पर जोडले जातील. विमानतळ शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरशी जोडणाऱ्या लँडसाइड एपीएम प्रणालीसह सुसज्ज असेल. तसेच ४७ मेगावॅट सौर ऊर्जा, शाश्वत विमान इंधनासाठी स्वतंत्र संचयन सुविधा (एसएएफ), आणि ईव्ही बस सेवा सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध असेल.एनएमआयए हा देशातील पहिले विमानतळ असेल जे वॉटर टॅक्सी सेवेने जोडलेले असेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech