विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचे पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक केले आहे. दिल्लीतील उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष शिखर परिषदेत २०२५ ला संबोधित करताना ते म्हणाले, “आजचा कार्यक्रम विज्ञानाशी संबंधित आहे, पण मी प्रथम क्रिकेटबद्दल बोलेन.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आमच्या क्रिकेट संघाच्या यशाने संपूर्ण भारत आनंदी आहे. हा भारताचा पहिला महिला विश्वचषक विजय आहे. मी आमच्या महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमचे यश देशातील लाखो तरुणांना प्रेरणा देईल.”

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले, “आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा शानदार विजय! अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी अविश्वसनीय कौशल्य आणि आत्मविश्वासाने भरलेली होती. संपूर्ण स्पर्धेत संघाने असाधारण टीमवर्क आणि चिकाटी दाखवली. आमच्या क्रिकेटपटूंचे मनापासून अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय भविष्यातील चॅम्पियन खेळाडूंना खेळात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देईल.”

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदा आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद पटकावण्याची किमया साधली. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला क्रिकेट संघाने ५० षटकांत सात विकेट्स गमावून २९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.३ षटकांत २४६ धावांवर ऑलआऊट झाला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech