नवी दिल्ली : तीर्थक्षेत्र पंढरपूरचा आषाढी सोहळा आज (दि. ६) भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. संतांच्या पालख्या रात्री तीर्थक्षेत्र पंढरीत दाखल झाल्या आहेत. यंदा आषाढी सोहळ्यासाठी सुमारे २० लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.यामुळे पंढरीनगरी भाविकांनी दुमदुमली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.५,२०० जादा बसेस आषाढीकरिता सोडल्या आहेत. जादा रेल्वे गाड्यादेखील धावत आहेत,खासगी वाहनांनीदेखील भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. दशमी दिवशी चंद्रभागा वाळवंट, भक्तिसागर ६५ एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तिमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. दर्शन रांग मंदिरापासून पत्राशेडच्या पुढे गोपाळपूर येथून पुढे रांझणी रस्त्यावर ७ कि.मी.पर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत ४ लाखांहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत, तर ६५ एकर भक्तिसागरात ४ लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत. येथील तूंब, राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत.