नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) मंगळवारी(दि.५) संसदीय गटाची बैठक झाली. या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी एनडीए खासदारांच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरसंदर्भात एक ठरावही मंजूर करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. या दरम्यान संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने आणि “भारत माता की जय”च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
संसदेच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा संसदेमध्ये बिहारच्या मतदार यादीवरून गोंधळ सुरु आहे. दोन्ही सभागृहांमध्ये सतत विरोधकांचे आंदोलन सुरू आहे. एनडीएची ही बैठक बराच काळानंतर होत आहे. चालू संसदीय अधिवेशनात एनडीएची ही पहिलीच बैठक आहे. यात सत्ताधारी आघाडीतील नेते सहभागी झाले होते. ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहात झालेल्या आक्रमक चर्चेनंतर हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.