* जी-७ शिखर परिषदेतही होणार सहभागी
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच विदेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांचा पाच दिवसीय दौरा ते करणार आहेत.त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि.१५) सायप्रसला रवाना झाले. कॅनडामध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत ही पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.
१५ ते १८ जून दरम्यान पंतप्रधान मोदी सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाला या तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर असणार आहेत. दोन दशकांत भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच सायप्रस दौरा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, १५-१६ जूनचा हा दौरा सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्या निमंत्रणावरून होत आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांच्यात राजधानी निकोसियामध्ये चर्चा होईल. ते लिमासोलमध्ये उद्योजकांना संबोधित करतील.
सायप्रस नंतर दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी कॅनडाला जाणार आहेत. पंतप्रधान मोदी १६-१७ जून रोजी कॅनडामध्ये असतील आणि सलग सहाव्यांदा जी-७ शिखर परिषदेत सहभागी होतील. जी-७ देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत.ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला परदेश दौरा द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या आणि युरोपियन युनियन आणि भूमध्यसागरीय प्रदेशाशी भारताचे संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.