नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि.२२) सकाळी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी जीएसटी प्रणालीतील बदलांबद्दल भाष्य केलं आणि आत्मनिर्भर भारतासाठी सामूहिक प्रयत्नाचं आवाहनही केलं. तसेच, त्यांनी आपल्या एक्स हँडलवर पंडित जसराज यांचे एक भक्तीगीत देखील शेअर केलं. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिलं कि, “आपण सर्वांना नवरात्रीच्या अनंत शुभेच्छा. साहस, संयम आणि संकल्प याने भरलेला हा भक्तीमय पवित्र सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि नव विश्वास घेऊन येवो. जय माता दी!”
ते पुढे म्हणाले, “नवरात्रीमध्ये आज माता शैलपुत्रीच्या विशेष पूजनाचा दिवस आहे. माझी प्रार्थना आहे की मातेच्या स्नेह आणि आशीर्वादाने प्रत्येकाचं जीवन सौभाग्य आणि आरोग्याने परिपूर्ण होवो.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, यंदाची नवरात्र ही खूप खास आहे. त्यांनी जीएसटीमधील बदलांचा उल्लेख करत सांगितले की, जीएसटी बचत उत्सव आणि स्वदेशीच्या मंत्राला या काळात एक नवी ऊर्जा मिळणार आहे. “चला, विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पसिद्धीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करूया,” असं आवाहन त्यांनी केलं.
पंतप्रधानांनी नवरात्रीसंदर्भात आणखी एक पोस्ट केली आणि जनतेला एक संदेश दिला. “नवरात्र हे भक्तीचं पर्व आहे. अनेक लोकांनी ही भक्ती संगीताच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. पंडित जसराज जींचं असंच एक भावपूर्ण गायन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे,” असं त्यांनी लिहिलं. ते पुढे म्हणाले, “तुम्ही एखादं भजन गायलं असेल किंवा तुमचं आवडतं भजन असेल, तर कृपया ते माझ्यासोबत शेअर करा. मी पुढील काही दिवसांत त्यातील काही पोस्ट करणार आहे.”