बिहार निवडणूक : पंतप्रधान मोदी घेणार १० जाहीर सभा

0

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या १० जाहीर सभा प्रस्तावित आहेत. यातील पहिली सभा २४ ऑक्टोबर रोजी समस्तीपूर येथे होणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २५ सभा घेणार आहेत. छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा कोणताही कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. बिहार निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व पक्ष प्रचारात जोर लावत आहेत, मात्र एनडीए आघाडीवर असल्याचे चित्र दिसते. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता प्रचाराचे संपूर्ण रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते तुफान प्रचार करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या १० जाहीर सभा प्रस्तावित आहेत. सभास्थळांची निवड करून ती माहिती पंतप्रधान कार्यालयाला (PMO) पाठवण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा जवळपास २५ सभा घेतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर वरिष्ठ नेतेही जवळपास तेवढ्याच सभा घेणार आहेत. संपूर्ण रोडमॅप तयार करण्यात आला आहे.

जायसवाल म्हणाले की, “पंतप्रधानांचा बिहार दौरा २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या दिवशी ते दोन ठिकाणी सभा घेतील. प्रचाराची सुरुवात समस्तीपूर येथून होईल. त्यानंतर ते बेगूसरायला जाऊन तिथेही सभा घेतील. त्यांचा दुसरा प्रस्तावित दौरा २९ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्याची माहिती लवकरच दिली जाईल.”ते पुढे म्हणाले की, “सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि छठ सण साजरा करणाऱ्या सामान्य नागरिकांना अडथळा होऊ नये म्हणून पंतप्रधानांचा छठ दिवशी कोणताही कार्यक्रम ठेवलेला नाही. त्यांनी यायला इच्छा दर्शवली होती, पण लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech