तामिळनाडू चेंगराचेंगरी : हायकोर्टाचा सीबीआय चौकशीस नकार

0

करूर येथील विजय यांच्या रॅलीतील दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू

चेन्नई : तामिळनाडूच्या करूर येथे अभिनेता व राजकारणी थलपति विजय यांच्या पक्ष तामिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) यांच्या रॅलीत २७ सप्टेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन ४१ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, हायकोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. मद्रास उच्च न्यायालयातील न्या. एम. धंदापानी आणि न्या. एम. जोतिरमन यांच्या मदुरै खंडपीठाने सदर याचिकेवर सुनावणी घेतली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की,

राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गांलगत सार्वजनिक रॅलीचे आयोजन होऊ नये. तसेच, भविष्यातील कोणत्याही रॅलीसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची हमी दिली जावी. एम.एल. रवि नावाच्या व्यक्तीने या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. मात्र, खंडपीठाने सांगितले की, याचिकाकर्ता एक राजकीय व्यक्ती असून पीडितांशी त्यांचा काहीही संबंध नाही. न्यायालयाचे राजकीय आखाड्यात रूपांतर होऊ देता येणार नाही. त्यामुळे ही याचिका राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचे दर्शवत ती फेटाळण्यात आली. दरम्यान चेंगराचेंगरीच्या घटनेची सीबीआय मार्फत चौकशीची मागणी करणारी आणखी एक याचिकाही न्यायालयाने अस्वीकार केली.

पीडित कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याच्या मागणीवरील याचिकांवर देखील न्यायालयाने सुनावणी घेतली. यावेळी तमिळनाडू सरकार आणि अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षास नोटीस बजावण्यात आली असून २ आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपये, तर जखमींसाठी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच तमिळनाडू सरकारने मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या प्रकरणात राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेवरही उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की,लोकांचे प्राण वाचवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मूलभूत सुविधा पुरवणे अत्यावश्यक होते.अंतरिम आदेशात न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की भविष्यातील कोणतीही मोठी रॅली महामार्गालगत आयोजित करताना पेयजल, रुग्णवाहिका, शौचालय आणि सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग यांची पूर्तता करण्यात यावी. या दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या प्राथमिक चौकशीत पोलिसांनी दाखवले की, विजय यांच्या ७ तासांच्या उशिरामुळे जमलेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेली, आणि त्यामुळे ही घातक भगदड निर्माण झाली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech