बंगळुरू : शुक्रवारी बंगळुरूच्या एका विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि माजी जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा यांना मोलकरीण बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. न्यायालय उद्या शनिवारी (२ ऑगस्ट) शिक्षेची घोषणा करणार आहे. निकाल जाहीर होताच प्रज्वल रेवण्णा भावुक झाला आणि न्यायालयातून बाहेर पडताना अश्रू अनावर झाले.
हे प्रकरण एप्रिल २०२४ मध्ये समोर आले होते, जेव्हा रेवण्णाच्या कुटुंबाच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या एका महिलेनं त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. तिने २०२१ पासून त्याने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तसेच, घटनेबद्दल कुणाला काही सांगितल्यास रेकॉर्ड केलेले व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिल्याचेही तिचे म्हणणे होते.
१८ जुलै रोजी न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण आवश्यक असल्यामुळे निकाल ३० जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. न्यायालयाने रेवण्णावर बलात्कार, गोपनीयता भंग, गुन्हेगारी धमकी, आणि अश्लील व्हिडिओ लीक करण्यासंबंधी विविध गंभीर कलमांखाली दोष निश्चित केला आहे.