बलात्कार प्रकरणात विशेष न्यायालयाने ठोठावली शिक्षा
बंगळुरू : बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरलेले जनता दलाचे (सेक्युलर) माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना आज, शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कर्नाटकच्या मैसूर येथील केआर नगरमधील एका घरगुती कामगार महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कर्नाटकातील विशेष न्यायालयाने हे प्रकरण हाताळले. विशेष न्या. संतोष गजानन भट यांनी शिक्षा सुनावली आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर बलात्काराचे ४ वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. हे प्रकरण एका महिलेशी संबंधित आहे. पिडीत महिला हसन जिल्ह्यातील देवेगौडा कुटुंबाच्या ‘गन्निकाडा फार्महाऊस’वर घरकाम करत होती. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू असलेले प्रज्वल रेवन्ना २०२१ मध्ये हसनमधील फार्महाऊस आणि बंगळुरूमधील त्यांच्या घरी या महिलेसोबत २ वेळा बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरले. त्यांनी हे कृत्य स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीत करून ठेवले होते आणि जर कुणाला सांगितले, तर हे व्हिडिओ लीक करण्याची धमकीही दिली होती.
विशेष सरकारी वकील अशोक नायक यांनी सांगितले की, या प्रकरणात सरकारी पक्षाने २६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि १८० कागदपत्रे सादर केली. याप्रकरणात मुख्य पुरावा पीडितेचा होता, जो अत्यंत विश्वासार्ह ठरला. विशेष तपास पथकाने (एसआयटी) सप्टेंबर २०२४ मध्ये १६३२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये ११३ साक्षीदारांचे जबाब होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी २६ एप्रिल २०२४ रोजी हसन येथे प्रज्वल रेवन्ना यांच्याशी संबंधित अश्लील व्हिडिओ असलेला पेन-ड्राईव्ह प्रसारित झाला होता. प्रज्वल रेवन्ना यांना गेल्या वर्षी ३१ मे रोजी जर्मनीहून बंगळुरू विमानतळावर आल्यानंतर होलेनरसीपुरा पोलिसांनी अटक केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते हसन मतदारसंघातून पराभूत झाले. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर जेडीएस पक्षाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते.