
तिरुअनंतपुरम : देशामध्ये वयाने कृतिशील लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. त्या केरळमधील एर्नाकुलम येथील सेंट तेरेसा महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभाला राष्ट्रपती उपस्थित होत्या. राष्ट्रपती म्हणाल्या की, केरळमधील महिलांनी राष्ट्राला नेतृत्व दिले आहे. संविधान सभेतील अभूतपूर्व-विलक्षण कार्य करणा-या पंधरा महिला सदस्यांनी भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये समृद्ध दृष्टिकोन जोडला. त्या पंधरा उत्कृष्ट महिलांपैकी तीन केरळमधील होत्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, सेंट तेरेसा महाविद्यालयामधील हुशार विद्यार्थिनी तरुण भारत, समृद्ध भारत आणि चैतन्यशील भारताचे प्रतिनिधित्व करतात. सेंट तेरेसा महाविद्यालय आध्यात्मिक मूल्यांविषयी दृढ वचनबद्ध असून, देशात महिला शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र उभारणीत हे एक मोठे योगदान आहे. गेल्या दशकात लिंग गुणोत्तराचा विचार करता, महिलांसाठीच्या निधी तरतुदीत साडेचार पट वाढ झाली आहे, यावर त्यांनी भर दिला. २०११ ते २०२४ दरम्यान महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमई जवळजवळ दुप्पट झाले आहेत. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे ७० टक्के महिला भागीदारी सहभाग साध्य करणे आहे. विविध सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील महिला भारताच्या प्रगतीला चालना देत आहेत. या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी देशाच्या विकासात योगदान देवून सकारात्मक भूमिका बजावत आहेत, हे पाहून आपल्याला आनंद झाल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.
सेंट तेरेसा महाविद्यालयाने शिक्षणाद्वारे शाश्वतता, नेतृत्व आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘SLATE’ नावाचा प्रकल्प हाती घेतला आहे, हे पाहून आनंद झाल्याचेही राष्ट्रपती म्हणाल्या. असा प्रकल्प हाती घेऊन, महाविद्यालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या उद्दिष्टांविषयी आपली वचनबद्धता दर्शविली आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांअंतर्गत तरुणांना भारताच्या उद्दिष्टांशी जोडणे आणि त्यांना उद्याच्या नोकऱ्यांसाठी सक्षम करणे हे या प्रकल्पाचे कौतुकास्पद उद्दिष्ट आहे. सेंट तेरेसा महाविद्यालयासारख्या उच्च शिक्षण देणा-या संस्था, भारताला ज्ञान महासत्ता म्हणून उदयास येण्यास मदत करतील असे त्या म्हणाल्या.