वंदे भारतच्या ३ गाड्यांनाही दाखवला हिरवा झेंडा
बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्नाटकमधील महत्त्वाच्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांचे उद्घाटन करत बेंगळुरू शहरासाठी ऐतिहासिक दिवस घडवला. त्यांनी बंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचे उद्घाटन केले तसेच तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. बंगळुरू मेट्रो फेज-२ अंतर्गत उभारण्यात आलेली यलो लाईन ही आरव्ही रोड (रागीगुड्डा) ते बोम्मासंद्रा दरम्यान आहे. तब्बल १९ किमीहून अधिक लांबीच्या या मार्गावर १६ स्थानके असून या प्रकल्पावर सुमारे ७१६० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या मेट्रो लाईनमुळे शहरातील दळणवळण सुलभ होणार असून लाखो नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे.
उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या समवेत मेट्रोने प्रवास केला. त्यांनी आरव्ही रोड ते इलेक्ट्रॉनिक सिटी मेट्रो स्थानक असा प्रवास करत प्रत्यक्ष मेट्रोच्या सुविधेचा अनुभव घेतला. बंगळुरूची नम्मा मेट्रो ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मेट्रो सेवा आहे, जिथे दररोज सुमारे ८ लाख प्रवासी प्रवास करतात. यलो लाईन कार्यान्वित झाल्याने मेट्रोचे एकूण नेटवर्क आता ९६ किमीहून अधिक झाले आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी १५ हजार ६१० कोटी रुपये खर्चाच्या फेज-३ प्रकल्पाचाही शिलान्यास केला. या टप्प्यात ४४ किमीहून अधिक लांबीच्या मेट्रो मार्गावर ३१ उन्नत स्थानके प्रस्तावित आहेत.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी बंगळुरू ते बेळगाव, अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा, आणि नागपूर (अजनी) ते पुणे या तीन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवला. प्रवासादरम्यान पंतप्रधानांनी गाडीतून प्रवास करणाऱ्या मुलांशी संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.या नव्या वंदे भारत गाड्यांमुळे प्रवाशांना जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार असून प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.