नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी ब्रिटन आणि मालदीवच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले. या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध मजबूत होतील आणि ठोस परिणाम साध्य होतील अशी आशा व्यक्त केली जातेय. पंतप्रधान दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज रात्री लंडनला पोहोचतील. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदींचा हा चौथा ब्रिटन दौरा आहे. आपल्या प्रस्थान निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि ब्रिटनमधील व्यापक धोरणात्मक भागीदारीने अलिकडच्या काळात लक्षणीय प्रगती केली आहे. आमचे सहकार्य व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, शिक्षण, स्थिरता, आरोग्य आणि लोक-ते-लोक संबंधांमध्ये पसरलेले आहे.
नरेंद्र मोदी या दौऱ्यात पंतप्रधान स्टारमर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, ज्यामध्ये भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराला (एफटीए) गती देण्यावर आणि आर्थिक भागीदारीला चालना देण्यावर चर्चा होईल, जेणेकरून दोन्ही देशांमध्ये समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल. यावेळी पंतप्रधान मोदी किंग चार्ल्स तिसरे यांची देखील भेट घेतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, पंतप्रधान मोदी मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून २५ आणि 26 जुलै रोजी मालदीवचा दौरा करतील. मालदीवचा हा त्यांचा तिसरा दौरा आहे आणि राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांच्या कार्यकाळातील राष्ट्रप्रमुखांचा हा पहिलाच दौरा आहे.
उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान मोदी २६ जुलै रोजी मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ऑक्टोबर २०२४ मध्ये स्वीकारलेल्या ‘व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी’च्या दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी मी राष्ट्रपती मुइझ्झू आणि इतर मालदीवच्या नेत्यांसोबतच्या भेटींसाठी उत्सुक आहे. भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरण आणि ‘व्हिजन ओशन’ अंतर्गत हिंद महासागर क्षेत्रातील शांतता, समृद्धी आणि स्थिरतेसाठी सहकार्य मजबूत करेल.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही देशांसोबतच्या चर्चेत पायाभूत सुविधा, संरक्षण, आर्थिक संपर्क आणि सागरी सुरक्षा यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश असेल. पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला की या भेटीमुळे दोन्ही देशांच्या जनतेला फायदा होईल आणि भारताच्या प्रादेशिक धोरणांना बळकटी मिळेल असे ठोस परिणाम मिळतील.