पुणे : स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ महाराष्ट्र संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळणार आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३ शतके झळकावली आहेत आणि त्याच्या कारकिर्दीत ४५०० हून अधिक धावा केल्या आहेत. शॉने पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी२० आंतरराष्ट्रीय सामना देखील खेळला आहे. त्याने कसोटीत ३३९ धावा आणि एकदिवसीय सामन्यात १८९ धावा केल्या आहेत. “माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर महाराष्ट्र संघात सामील झाल्यामुळे मला एक क्रिकेटपटू म्हणून प्रगती करण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही वर्षांत मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खूप आभारी आहे. अलिकडच्या वर्षांत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने राज्यभरात क्रिकेट पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत.” असं मत पृथ्वी शॉने व्यक्त केलं आहे. पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे स्थानिक क्रिकेटमध्ये दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. आणि त्याच्या मागणीनंतर त्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. अखेर त्याने मुंबईच्या संघाची साथ सोडत महाराष्ट्राच्या संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.