मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी २६ लाखांची मदत
मुंबई : अनंत नलावडे
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती, घरे, जनावरे आणि जगण्याची साधनं उद्ध्वस्त झालेली असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण करत मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हेही उपस्थित होते.
आज बँकेने केलेली कृती फक्तं प्रेरणादायीच नसून सहकार चळवळीच्या ‘सामूहिक कल्याण’ या तत्वाला खऱ्या अर्थाने न्याय देणारा असून बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केल्याची प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
कृषीमंत्री भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १ कोटी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार २५ लाख ५१ हजार रुपये आणि संचालक मंडळाचा सभाभत्ता १ लाख रुपये असे एकूण १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आली आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने याआधीही विविध आपत्तीच्या काळात सामाजिक जबाबदारी जपत मदतीचे कार्य केले आहे.यंदाच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.