पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. नुकताच त्यांचा सोलापूर जिल्ह्यातील महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून राज्यातील राजकारणही चांगलंच तापलं होतं. अशातच आता अजित पवार आणि पुण्यातील एका महिलेच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही पुणेरी महिला अजितदादांना थेट गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याप्रमाणे काम करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागातील उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची पाहणी केली. यावेळी काही नागरिकांनी अजितदादांसमोर समस्यांचा पाढा वाचला. काही नागरिकांनी पाणी मिळत नसल्याची, तर काहींनी खराब रस्त्यांची आणि वाहतूक कोंडीची समस्या दादांना सांगितली.