नवी दिल्ली : सरकार देशाच्या सुरक्षेशी, परराष्ट्र धोरणाशी आणि लोकशाहीच्या मूलभूत प्रक्रियांशी संबंधित प्रश्नांवर कोणतेही ठोस उत्तर देत नाही, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते आज बुधवारी संसद भवन संकुलात पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी परराष्ट्र धोरण, ऑपरेशन सिंदूर, मतदार यादीतील गोंधळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.
राहुल गांधी म्हणाले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील विधानाचा उल्लेख करत त्यांनी विचारले की, “ट्रम्प यांनी २५ वेळा सांगितले की त्यांनी भारतात युद्धबंदी आणली, मग यावर सरकार किंवा पंतप्रधान मोदींनी अजूनही मौन का बाळगले आहे?” राहुल गांधी म्हणाले की, सरकार ऑपरेशन सिंदूरमध्ये विजय मिळवला असल्याचा दावा करत आहे, पण ते ऑपरेशन आजही सुरूच आहे, मग विजय कसा आणि केव्हा मिळाला? “युद्ध सुरू आहे की संपले आहे, दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत?” असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, युद्धाच्या काळात भारताला कोणत्याही आंतरराष्ट्रीय देशांचा ठोस पाठिंबा मिळाला नाही. यामुळे मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे राहुल गांधी यांनी ठासून सांगितले.
बिहारमधील चालू असलेल्या मतदार यादी सुधारणा (एसआईआर) प्रक्रियेवर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, केवळ बिहार नव्हे, तर महाराष्ट्र व कर्नाटकमध्येही अशाच प्रकारच्या गंभीर अनियमितता आढळल्या आहेत. “महाराष्ट्रात एक कोटी नव्या मतदारांची भर घालण्यात आली आहे. काँग्रेसने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड आणि व्हिडिओग्राफी मागितली, मात्र ती नाकारण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की काँग्रेसने कर्नाटकमधील निवडणुकीतील गोंधळाचा सखोल तपास केला असून, निवडणूक कशी चोरी झाली याचे स्पष्ट पुरावे पक्षाकडे आहेत. “आम्ही हे सर्व काळ्या-पांढऱ्या स्वरूपात दाखवू शकतो,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, काँग्रेसने काही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदार यादीचे डिजिटल विश्लेषण केले असून, त्यातून नव्या मतदारांची फसवणूक कशी होते हे उघड झाले आहे.