नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता त्यांच्या नवीन सरकारी निवासस्थानी स्थलांतरित झाले आहेत. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजेच १९ जून रोजी नवीन घरात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे आता राहुल गांधी यांचा नवीन पत्ता हा बंगला क्रमांक ५, सुनहरी बाग रोड असेल, जो त्यांनी त्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून स्वीकारला आहे.
गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी १२, तुघलक लेन येथील सरकारी निवासस्थानात राहत होते, जे त्यांना खासदार म्हणून देण्यात आले होते. परंतु, २०२३ मध्ये मानहानीच्या खटल्यामुळे त्यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर त्यांना तो बंगलाही रिकामा करावा लागला. त्यानंतर ते त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ येथील निवासस्थानी राहू लागले. आता लोकसभेत विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांना पुन्हा सरकारी बंगला देण्यात आला आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवार(दि.१९) पासून त्यांचे वैयक्तिक सामान बंगला क्रमांक ५ मध्ये हलवण्यास सुरुवात केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी ते या नवीन निवासस्थानी पूर्णपणे राहण्यास सुरुवात करतील. हा बंगला दिल्लीच्या व्हीआयपी परिसरात आहे आणि त्याची सुरक्षा, सुविधा आणि आकारमान वरिष्ठ मंत्र्याच्या दर्जानुसार आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाल्यानंतर, राहुल गांधींना केंद्र सरकारने कॅबिनेट मंत्री दर्जाचा टाइप-८ सरकारी बंगला देण्यात आला होता. हा बंगला पूर्वी कर्नाटकातील भाजप नेते आणि माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांच्याकडे होता. २०२१ ते २०२४ पर्यंत ए. नारायण स्वामी या त्याचा वापर केला.
यावेळी राहुल गांधींचा वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदाचा प्रसंग नव्हता, तर तो एका नवीन राजकीय सुरुवातीचे प्रतीक बनला. आता ते संसदेत विरोधी पक्षाचा आवाज बनतील आणि केंद्र सरकारला आव्हान देतील, त्यामुळे त्यांचे नवीन सरकारी निवासस्थान त्यांच्या नवीन जबाबदारीचे प्रतीक बनले आहे. येणाऱ्या काळात, सुनहरी बाग रोडवरून उदयास येणारी रणनीती भारतीय राजकारणाला कोणते नवे वळण देते हे पाहणे रंजक ठरणार आहे.