आमचं सरकार आल्यावर निवडणूक आयोगाविरुद्ध कारवाई करू – राहुल गांधी

0

पाटणा : “एक दिवस ती खरी गोष्टही समोर येईल, ज्यात हे उघड होईल की बिहारची मागील निवडणूकही चोरी करून जिंकली गेली होती. निवडणूक आयोगातील लोकांनी लक्षात ठेवावेत, आमचं सरकार आल्यावर त्यांच्या विरोधात नक्कीच कारवाई केली जाईल.” असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शेखपूरा येथे जनसभेला संबोधित करताना म्हणाले.

राहुल गांधी हे बिहारमध्ये ‘मतदार अधिकार यात्रेवर निघाले आहेत. यात्रेच्या चौथ्या दिवशी बुधवारी त्यांचा मुक्काम शेखपूरा येथे झाला, जिथे त्यांनी जाहीर सभेतून केंद्र आणि बिहार सरकारवर जोरदार निशाणा साधला.शेखपूरा जिल्ह्यातील बर्बिघा येथे लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “हिंदुस्तानातील गरीबांकडे आता केवळ मतदानाचा अधिकार शिल्लक आहे. भाजप सरकार तोही अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचं मत गेलं, तर नंतर रेशन कार्ड, त्यानंतर जमीन आणि मग तुमच्याकडे जे काही उरलंसुरलं आहे तेही हरवून जाईल.”

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “निवडणूक आयोग आणि भाजप सरकार एकत्र येऊन मतदान चोरीचं काम करत आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेस जिंकली, पण चार महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतं चोरी करून सत्ता उलथवली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल एक कोटी नवे मतदार जोडले गेले.”राहुल गांधी म्हणाले की, “बिहारमध्ये गेली २० वर्षे नितीशजींचं सरकार आहे. जर येथेही चौकशी झाली, तर हेच दिसून येईल की मागील विधानसभा निवडणुकीतही मतदान चोरी करूनच बिहारमध्ये निवडणूक जिंकली गेली आहे. ही खरी गोष्ट आहे आणि ही खरी गोष्ट एक दिवस नक्कीच बाहेर येणार आहे.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech