मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाल्यानंतर घडल्याने आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज ठाकरे सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याचे समजते. यानंतर लगेचच राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानावरून निघून शिवतीर्थवर गेल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पावसामुळे झालेली पूरस्थिती, पाऊस आणि मिठी नदीसह विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र बेस्ट निवडणुकीत मनसेसह ठाकरे बंधूंच्या युतीचा दारुण पराभव झाल्यानंतर लगेचच राज ठाकरे यांची ही भेट आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे १४ तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. ठाकरे बंधूंचा २१-० ने पराभव झाल्यानंतर भाजपासह महायुतीतील अनेक नेत्यांनी ठाकरेंवर टीका केली.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरदार सुरू आहे. यातच बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड अपयशी ठरल्यानंतर ठाकरे बंधूंच्या आगामी मुंबई महानगपालिकेतील युतीबाबत आणखी संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यातच राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.