कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा!
मुंबई : कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आजचा हा मेळावा आणि मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तीच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही. खरंतर हा प्रश्नच अनाठायी होता. गरज नव्हती. कुठून हिंदीचं आलं, ते कळलं नाही. हिंदी, कशासाठी हिंदी? कुणासाठी हिंदी. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही.. आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं.. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
प्राथमिक शाळांमधील हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन्ही शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (उबाठा) व मनसेच्या वतीने आज मुंबईतील एनएससीआय डोम येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राज ठाकरेंनी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा एकवटतो, ह्याचं चित्र उभं राहील असतं. नुसत्या मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. मात्र, पाऊस असल्यामुळे अशा जागा कार्यक्रमासाठी घेता येत नाहीत. हे सभागृह अपुरं आहे, त्यामुळे हजारो लोक बाहेर उभे आहेत. मी बाहेर उभ्या लोकांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण त्यांना आत येता आलं नाही.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करतात, आता माघार घेतली तर काय करायचं. वेगळ्या ठिकाणी प्रयत्न करून पाहिले. ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकली मग काय झालं? देवेंद्र फडणवीस इंग्रजी शाळेत शिकले, दादा भुसे मराठी शाळेत शिकून मंत्री झाले. कुणाची मुले कुठे शिकतात याची लिस्ट आहे आमच्याकडे. कुणाला न विचारता निर्णय लादला. तुमच्याकडे सत्ता आहे विधान भवनात आणि आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. दादासाहेब भुसे आले होते म्हणाले, मी काय बोलतो ते ऐकून घ्या. मी म्हणालो ऐकून घेईल पण ऐकून घेणार नाही. मला म्हणाले, केंद्राच्या शिक्षण धोरणात हिंदी मुद्दा आहे. महाराष्ट्रात यांनी प्रयत्न करून पाहिला. दक्षिणेतील राज्य यांना विचारत पण नाही, त्याशिवाय का यांनी माघार घेतली. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान कोणता विषय तिसरा घेणार आहेत. मराठीच तिसरा विषय घ्यायला हवा. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात, ज्याला इंग्रजी येतं त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणवून. पण तुम्हाला येतं कुठे?
आम्ही मराठी मीडियात शिकलो, हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. होय. मग यांना मराठीचा पुळका कसा? बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घेऊ शकता का? लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंटमध्ये शिकले. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे?, असा सवाल ठाकरेंनी केला.
या हिंद प्रांतात सव्वाशे वर्षे आम्ही राज्य केलं. आम्ही मराठी लादली? गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश टोकापर्यंत आम्ही पोहोचलो. आम्ही लादली? हिंदी भाषा २०० वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी? यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कुणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा. मुंबईला हात घालून दाखवा. मजाक वाटला का? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत,” असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र ज्यावेळी पेटून उठतं, त्यावेळी काय घडतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? विनाकारण आणलेला विषय होता. हिंदीभाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, हिंदी न बोलणारी राज्ये आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत.. आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना राज्यांचा विकास करता आला नाही. कोणसाठी हिंदी शिकायचं? पाचवीनंतर पोरगा हिंदी चित्रपटसृष्टीत जाणार का, असं राज म्हणाले.